रचना क्र. 66
हरि आला रे हरि आला रे
श्री ज्ञानेश्वर महाराज
हरि आला रे हरि आला रे ।
संतसंगे ब्रह्मानंदु जाला रे ॥१॥
हरि येथे रे । हरि तेथे रे ।
हरिवाचूनि न दिसे रिते रे ॥२॥
हरि पाही रे । हरि ध्याई रे ।
हरिवाचूनि दुजे नाही रे ॥३॥
हरि वाचे रे । हरि नाचे रे ।
हरि पाहाता आनंदु साचे रे ॥४॥
हरि आदि रे । हरि अंती रे ।
हरि व्यापकु सर्वाभूती रे ॥५॥
हरि जाणा रे । हरि वाना रे ।
बापरखुमादेविवरु राणा रे ॥६॥
