रचना क्र. 95
कैसी लागे मज या नामाची गोडी
श्री आनंदसागर
कैसी लागे मज या नामाची गोडी ।
पायाची आवडी रात्रंदिन ॥धृ॥
रात्रंदिन माझे चित्ती वसे राम ।
ऐसे कोणी काम पुरवावे ॥१॥
पुरवील काम तो माझे जीवन ।
तयासी नमन अष्टभावे ॥२॥
अष्टभावे तया नमन सर्वकाळ ।
जेणे घननीळ भेटवीला ॥३॥
भेटवीला सर्व जगाचा जिव्हाळा ।
तोही माझा झाला मायबाप ॥४॥
माझे मायबापा सद्गुरुसमर्था ।
तुझे चरणी माथा ठेवी हरी ॥५॥
