रचना क्र. 164
महाराज सांगाल काय हो
श्री पेठेकाका
महाराज सांगाल काय हो मार्गाच्या मर्मा ?
कुण्या पथी मी जाइन तुमच्या समाधानधामा ?॥धृ॥
कुणि सांगे ‘करि पाच पूर्णिमा’
कुणी म्हणे ‘जा नित गुरुग्रामा
पारायण करि, धरि उपवासा’
येईल का कामा ? ॥१॥
कुणी म्हणे ‘जा सेवेसाठी
प्रदक्षिणा करी, काढी उष्टी
वचन-प्रवचने धरि तू कंठी’
येईल का कामा ? ॥२॥
कुणि पूजा करि अष्टौप्रहरी
कुणि आरति करि जाइ घरोघरि
चर्चा करि अन् सांगे जगाला
येईल का कामा ? ॥३॥
‘प्रपंच, तू ते तसेच राहो
परि फोडी नामाचा टाहो
बारीमध्ये दिवसही जावो’
येईल का कामा ? ॥४॥
कितीक वाटा चालुनि दमलो
मार्ग मते मी पाहुनि श्रमलो
समाधान मज कुठे न गवसे
समजावा मर्मा ! ॥५॥
‘प्रेम , नाम , कर्तव्यी तत्पर
वृत्यंतर, अभ्यास निरंतर
मीच तुझ्या येईन घरी रे
दीना धरि मर्मा !’॥६॥
‘याच पथी तू येशिल माझ्या समाधानधामा... !!’
