रचना क्र. 190
ज्याला वळे त्याला कळे
श्री पेठेकाका
ज्याला वळे त्याला कळे ।
बाकी भ्रमलेले सगळे ! ॥धृ॥
बाळगून शब्दज्ञाने ।
कोणी होत का शहाणे ? ॥१॥
भरल्या नदीचे दर्शन ।
त्याने भागे का तहान ? ॥२॥
रची कर्मांचे डोंगर ।
जीव झाला का अमर ? ॥३॥
जन्मोजन्मी प्रदक्षिणा ।
कोणी गाभारी जाईना ! ॥४॥
दीन म्हणे वर्म कळे ।
त्याची येरझार टळे ! ॥५॥
