रचना क्र. 218
मार्गी सांभाळा आम्हांसी
श्री पेठेकाका
मार्गी सांभाळा आम्हांसी ।
तुमचे पायी ही विनंती ॥धृ॥
आम्ही जाणू तुमचा मार्ग ।
आम्ही चालू तुमचा मार्ग ।
राहुनि तत्पर कर्तव्यासी ।
आणिक अढळ तव मार्गासी॥१॥
अमुचा श्वास तुमचे हाती ।
नि:श्वास तुमचे हाती ।
अमुचा देह तुमचे हाती ।
तरिही चालू तव मार्गासी ॥२॥
अमुचा प्रपंच तुमचे हाती ।
गणगोत तुमचे हाती ।
अमुचे क्षेम तुमचे हाती ।
तरिही चालू तव मार्गासी ॥३॥
अमुचे ऐहिक तुमचे हाती ।
पारलौकिक तुमचे हाती ।
तडीस नेणे तुमचे हाती ।
तरिही चालू तव मार्गासी ॥४॥
अमुचा विवेक तुमचे हाती ।
वैराग्य तुमचे हाती ।
अमुचे निश्चय तुमचे हाती ।
तरिही चालू तव मार्गासी ॥५॥
अमुचे मौन तुमचे हाती ।
अध्ययन तुमचे हाती ।
अमुचे भजन तुमचे हाती ।
तरिही चालू तव मार्गासी ॥६॥
अमुचे नाम तुमचे हाती ।
अनुसंधान तुमचे हाती ।
अमुचे साधन तुमचे हाती ।
तरिही चालू तव मार्गासी ॥७॥
