रचना क्र. 240
खरी सुखशांती मिळवाया
श्री पेठेकाका
खरी सुखशांती मिळवाया ।
ठायी कल्याण साधाया ।
कुणि मिळवा रे रामराया ।
कुणि जागवा रे रामराया ।
अंतरिच्या रे देवराया ॥धृ॥
सुखासाठी जमिनी, इमले ।
कुणि सत्तेसाठी झटले ।
मान, पैशासाठी झुरले ।
बुवाबाजी, व्यसना भुलले ।
तरि शांती ना पावले ।
जगि थोर लोकही भ्रमले ।
कल्याणाचे मर्म कळाया ॥१॥ कुणि मिळवा रे...
नच शांति, विषय स्पर्धेचा ।
नच बाजारी घेण्याचा ।
आभास सर्व सौख्याचा ।
अंती ठरतो अस्वास्थ्याचा ।
घेतो घास काळ जन्माचा ।
होई सावध तो भाग्याचा ।
नरदेह व्यर्थ नच जाया ॥२॥ कुणि मिळवा रे...
देव प्रत्येकाच्या हृदयी ।
प्रेमी, सत्य, संयमी, न्यायी ।
नामे जागृत करता येई ।
कृति वृत्ति देवमय होई ।
राममय जे जीवन जाई ।
सुख साधे बसल्या ठायी ।
दीन विनवी तुमच्या पाया ॥३॥ कुणि मिळवा रे ...
