रचना क्र. 277
जन पावन होत असे चरणी
श्री रामदास स्वामी
जन पावन होत असे चरणी ।
सुखसारविचार मिळे चरणी ।
धरणीधर सुंदर गुण वदे ।
न कळे परपार बहु आपदे ॥ धृ॥
जगजीवन जागतसे जगती ।
जग दोष करूनि कसे जगति ।
मनीचा मनभाव कळोनि बळे ।
अभिमान गळे मग तो विवळे ॥१॥
वनिता धनसूत शरीर बरे ।
असते दिसते परि काय खरे ।
सुख होईल जाईल येकसरे ।
परि पावननाम नसे दुसरे ॥२॥
मनमान तुफान चळोनि बळे ।
मग प्रीति जहाज बुडे सगळे ।
जरी अंतरहेत चुकेल जनी ।
तरी नेमकभाव धरा वचनी ॥३॥
मृदभाषण नाशन दुर्जन रे ।
हृदयासन ते जन सज्जन रे ।
सुखसार विचार करूनि धरा ।
परी अंतरहेत बरा विवरा ॥४॥
