रचना क्र. 280
मी माझ्या गुरूचा
श्री पेठेकाका
मी न कुणाचा, मी न जगाचा मी माझ्या गुरूचा,
जाहलो मी माझ्या गुरुचा, धन्य हो मी माझ्या गुरूचा ॥धृ॥
तो देईल तरि अंथरेन मी ।
तो देईल तरि पांघरेन मी ।
जनी ठेवो वा वनात मजला, आनंदच त्याचा ॥१॥
मी माझ्या गुरूचा..
कधी उपेक्षा कधी तितीक्षा ।
स्तुतिनिंदेने बघे परीक्षा ।
जवळ दूर ठेवो तो एकच प्रसाद प्रेमाचा ॥२॥
मी माझ्या गुरूचा..
यशअपयश वा धननिर्धनमय ।
व्याधिग्रस्त ठेवोत, निरामय।
दीन म्हणे वैकुंठी जाइन दास म्हणुनि गुरूचा ॥३॥
मी माझ्या गुरूचा..
