रचना क्र. 13
हाती माझे काय देवा
श्री पेठेकाका
हाती माझे काय देवा कधी उमजेल ?
मी मी मी मी पिटतो डंका कधी हा थांबेल ? ॥धृ॥
ज्या देहाने करितो कर्मे
तो न माझे हाती
मी न जन्मा घातला तो
नाश करी नियती
पराधीन पायावरती इमला का टिकेल ? ॥१॥
मनबुद्धी असूनीया
दोन्ही हाती नाही
जुमानीना चराचर
लोकी सत्ता नाही
न करिता ‘मी केले’ हे कधी का घडेल ? ॥२॥
मी केले , मी करितो आहे ,
पुढे करणार
मिरवितो आजन्म मी
लोकी सांगणार
दीन म्हणे खरा कर्ता कधी आकळेल ? ॥३॥
