रचना क्र. 2
विचारगीता
श्री पेठेकाका
आहे शुद्ध विचाराचे,
स्थान मोठे जगात या ।
ज्ञानाचे, बुद्धिचे काम,
वाढले शतकात या ॥१॥
विचारे सार शोधावे,
ज्याने त्याने स्वतंत्रसे ।
अल्पबुद्धी इथे आहे,
थोडके दिधले असे ॥२॥
देहाचे जाणुनी मोल,
द्यावे स्थान तया खरे ।
निसर्गाच्या क्रमे त्याचे,
योग्य ते करणे बरे ॥३॥
चैनीत ठेवणे नाही,
त्याची आबाळही नसो ।
आजन्म कष्ट करण्याची,
शक्ती त्यात सदा वसो ॥४॥
कष्टाने मिळविणे पैसा,
दाने शुद्ध सदा घडो ।
चालेना त्याविना तरिही,
कोणी लोभात ना पडो ॥५॥
एक वेळ कमी चाले,
अती क्षोभास कारण ।
विनाकष्ट, अती जेथे,
दु:खी होईल जीवन ॥६॥
स्वजनांच्या दक्ष कर्तव्यी,
गुंतणे तेथ ना जरी ।
गरजा, स्वार्थ जाणूनी,
वर्तणे नित्य अंतरी ॥७॥
सुखाला सर्व नात्याचे,
जोडिती नसले तरी ।
नसे नाते कधी दु:खा,
पोरके जगते घरी ॥८॥
प्रारब्धाचा जमे मेळा,
एक त्यातील आपण ।
हीच अंतिम ठरे भेट,
जरी सावध जीवन ॥९॥
प्रपंच फाटका आहे,
राजा रंक कुणी जरी ।
बाहेर दिसते त्याला,
भुलणे कधि न अंतरी ॥१0॥
अपुरा आतुनी असतो,
रंगढंग वरी जरी ।
दोष ना त्यात कोणाचा,
पण जाणून हे करी ॥११॥
स्वावलंबी हरेकाने,
व्हावे शक्य तिथे, तसे ।
होते साह्य तया योगे,
ज्यांना ते जमले नसे ॥१२॥
अहंकार नसो ज्याला,
जमले स्वावलंबन ।
कृपा त्यात असे जाणा,
नसे स्वाधीन तनमन ॥१३॥
संस्था, सृष्टि, समूहांचे,
आजन्म ऋण मानवा ।
फेडणे ते पुढे आहे,
एक कर्तव्य या जिवा ॥१४॥
कर्माचे दास ना व्हावे,
कर्मे नित्य जरी करी ।
ध्येयास युक्त ती घ्यावी,
बाकीची टाळणे बरी ॥१५॥
कौशल्य निवडीमध्ये,
कर्मे करण्यातही असे ।
साधते ज्यास तो थोर,
अंती मुक्त सदा असे ॥१६॥
शब्द, सूर तशा रेषा ,
कला माणूस घडविती ।
अंतरंगे मनुष्यांची,
समृद्ध करिती किती ॥१७॥
अकृत्रिम कलाविश्व,
सृष्टीमध्ये वसे खरे ।
निरहंकार कसे कर्ते,
तेथे ते शिकणे बरे ॥१८॥
घडण्या कार्य कुठलेही,
होण्या सुकर जीवन ।
व्यवस्था लागते तेथे,
थोडे नियमपालन ॥१९॥
वेष वा देश वा न्याय,
कुटुंबे, कर्म, धर्म वा ।
व्यवस्था मानवी साऱ्या ,
स्मरणे नित्य मानवा ॥२0॥
म्हणुनी दोष व्यवस्थांत,
कोणी, कोठे करो किती ।
निर्जीव कायदे-शब्द,
चैतन्यास न बांधती ॥२१॥
निर्व्यवस्था नसे मार्ग,
करावे दोषशोधन ।
व्यक्तिचे स्वास्थ्य, स्वातंत्र्य,
गाठणे ध्येय पावन ॥२२॥
परंपरा परीक्षूनी,
घ्यावी निवडूनि आदरे ।
त्याज्य ते टाकिता धैर्ये,
मनी भीती नको बरेे ॥२३॥
ध्येयाची वर्तनी गाठ,
घालता हो परंपरा ।
काळ-प्रश्न नवे येता,
शोधणे नव उत्तरा ॥२४॥
शस्त्रे, रसायने, शास्त्रे,
औषधे, परमाणु वा ।
वाढती सुखविज्ञाने,
झेप ही दिव्य मानवा ॥२५॥
परी होता तसा आहे,
कर्ता मानव आदिम ।
स्वार्थ, दंभ, विकाराला,
कोठे उत्तर उत्तम ॥२६॥
खरी स्पर्धा स्वत:शीच,
बाकी दु:खास कारण ।
समाधान खरी प्रगती,
बाकीचे ढीग दारुण ॥२७॥
येथले येथ ठेवावे,
लागते सर्वही धन ।
घरेदारे असो सत्ता,
मृत्यूने पारखे जन ॥२८॥
मिळविता, टिकविता सर्व,
याचे भान सदा असो ।
अंति जो येत सांगाती,
त्याचे नाम मुखी वसो ॥२९॥
त्यासाठी वेळ काढावा,
व्यवसाय कुठला असो ।
अज्ञ वा सुज्ञ वा कोणी,
सानाथोर कसा असो ॥३0॥
कर्त्याला कर्मस्वातंत्र्य,
लाभले देव जाणण्या ।
सत्संग नित्य साधावा,
आत्मारामास भेटण्या ॥३१॥
सद्गुरू, साधनी व्यक्ती,
सेवावे आप्त ते खरे ।
मुक्तिचे तेच सांगाती,
नित्याने भेटणे बरे ॥३२॥
शाश्वतात समाधान,
देव सर्वांस नित्य तो ।
अंतरी असता त्याला,
जो तो सर्वत्र शोधितो ॥३३॥
अशाश्वत पहा सारे,
बदले विश्वव्यक्तिही ।
दु:ख अस्वास्थ्य हिंदोळे,
देते सर्वांस प्रत्यही ॥३४॥
जरी बदलतो देह,
नित्य चैतन्य यातिल ।
आजन्म चालतो श्वास,
ती त्याची खूण येथिल ॥३५॥
देवास शोधितो जगती,
श्वासाची जाण ना असे ।
मिळते का कुठे काही,
जेथे जे ठेविले नसे ॥३६॥
देहात चालतो श्वास,
काही ना करि सर्वथा ।
आजन्म कर्मव्यापार,
चाले का तरि अन्यथा ॥३७॥
तसा विश्वातला श्वास,
पाही शोधून कोणता ।
विश्वव्यापार तसा कर्ता,
थकते बुद्धि शोधता ॥३८॥
वाटते जगती ज्याला,
समाधान खरे हवे ।
त्याने उत्तर कोठेही,
शोधुनी पाहणे नवे ॥३९॥
शुद्ध बुद्धी असे तेथे,
अणूहि हितकारक ।
अंतरे नसता थोर,
ठरते सर्व मारक ॥४0॥
सेवा, प्रेम तसे सत्य,
शुद्ध आचार अन् मन ।
हेही देव, भजे त्याचे,
होते सार्थक जीवन ॥४१॥
विवेक देव वाटोत,
कोणा सगुण निर्गुण ।
अंतरा पालटी देव,
त्याच देवा खरेपण ॥४२॥
एक अध्याय गीता ही,
विचारे मननी ठसो ।
वाचितो आचरी जो जो,
दीनाचे नमन त्या असो ॥४३॥
-- श्रीराम --
