रचना क्र. 442
मी मज जाणत नाही
श्री पेठेकाका
मी मज जाणत नाही !
जगदीशाला, तसे जगाला ।
चेतन विश्वा, अचेतनाला ।
अल्पहि जाणत नाही ! ॥१॥
कसा, कुठेही जगात रमतो ।
अज्ञानी मी, स्वार्थी राहातो ।
ठाउकही मज नाही ! ॥२॥
त्रिगुणबद्ध मी, तत्त्वबद्ध मी ।
संचित, मन, बुद्धीत बद्ध मी ।
नकळे यांतिल काही ! ॥३॥
कौतुक वाटे अहंपणाचे ।
कारण जे हो मम नाशाचे ।
तरिही सावध नाही ! ॥४॥
दीन म्हणे गुरुशरण होउनी ।
सावध जगुनी, सत्य जाणुनी ।
मार्ग दुजा तुज नाही ! ॥५॥
