रचना क्र. 510
हेचि माझे तप हेचि माझे दान (चाल -२)
श्री तुकोबा
हेचि माझे तप हेचि माझे दान ।
हेचि अनुष्ठान नाम तुझे ॥१॥
हेचि माझे तीर्थ हेचि माझे व्रत ।
सत्य हे सुकृत नाम तुझे ॥२॥
हाचि माझा धर्म हेचि माझे कर्म ।
हाचि नित्यनेम नाम तुझे ॥३॥
हाचि माझा योग हाचि माझा यज्ञ ।
हेचि जपध्यान नाम तुझे ॥४॥
हेचि माझे ज्ञान श्रवण मनन ।
हेचि निजध्यासन नाम तुझे ॥५॥
हाचि कुळाचार हाचि कुळधर्म।
हाचि नित्यनेम नाम तुझे ॥६॥
हा माझा आचार हा माझा विचार ।
हा माझा निर्धार नाम तुझे ॥७॥
तुका म्हणे दुजे सांगायासी नाही ।
नामेवीण काही धनवित्त ॥८॥
