उपासनामाला॥ श्री ॥
रचना क्र. 6
श्री सद्गुरूंची मानसपूजा
❖
श्री पेठेकाका · null
null
नमन श्री गजवदना ।
यावे मम हृदयसदना ।
माझिया मानसपूजना ।
निर्विघ्न करावे गणराया ॥१॥
जगी उगवता दिनकर ।
सकळांसि वाटे आधार ।
तैसा आपुला वरदकर ।
असता धीर वाटतसे ॥२॥
माझिया पूजेचे प्रयोजन ।
सद्गुरूंचे व्हावे स्मरण ।
कृपेचे घडो चिंतन ।
अखंड टिको अनुसंधान ॥३॥
जीवपणी जन्मासि आलो ।
मी माझे करिता रमलो ।
आनंदाचे निजघर विसरलो ।
कधी कैचे कळेना ॥४॥
म्हणुनी दु:खी जाहलो ।
चिंता नैराश्ये ग्रासलो ।
अज्ञानअंधारी बुडालो ।
बेसावध होऊनी ॥५॥
तेव्हा श्री सद्गुरुरायासी ।
कळवळा उपजला मानसी ।
जागवुनी विचारी मजसी ।
वाया का भ्रमसी ॥६॥
जागे होता जाते स्वप्न ।
क्षणी पाहता नष्ट होऊन ।
दु:ख चिंता अज्ञान ।
नाहीसे केले झडकरी ॥७॥
आभाळाएवढे उपकार।
सद्गुरूंचे निरंतर ।
देवचि झाले साकार ।
दीनजीवा उद्धरावया ॥८॥
त्या सद्गुरूंचे टिकविण्या स्मरण ।
मांडिले हे मानसपूजन ।
सुलभ सोपे साधन ।
उपाधिविरहित ॥९॥
बाह्य पूजेचे नाना विधी ।
अनंत बंधने देहादि ।
मानसपूजेने उपाधी ।
अवघीची निरसिली ॥१०॥
म्हणोनी मानसपूजेचा संकल्प ।
तळमळीचे घेऊनी उदक ।
सर्वभाव करूनी एक ।
आर्ततेने सोडिला ॥११॥
गुरूंच्या गुरुवरा श्री दत्तगुरू ।
धाडून द्यावे आमुचे सद्गुरू ।
सप्रेम स्वीकारावया उपचारू ।
या मानसपूजेचे ॥१२॥
कृतज्ञतेचा सडा घालुनी ।
आदराच्या पायघड्या पसरुनी ।
उत्सुकतेचा चौघडा लावुनी ।
प्रतीक्षा मी करितसे ॥१३॥
संकल्पविकल्पांची दारे ।
उघडिली मिया निर्धारे ।
भगवदिच्छेचे वारे ।
हृदयमंदिरी खेळतसे ॥१४॥
यावे यावे श्री गुरुराया ।
प्रवेशुनी हृदयी माझिया ।
अतर्क्य तुम्ही किमया ।
साकार झाला गुरुपदाची ॥१५॥
निष्ठेचे ठेविले सिंहासन ।
वरी आज्ञापालनाचे आसन ।
आनंदे बैसावे आपण ।
मानसपूजन स्वीकारावया ॥१६॥
कृपा स्मरणाचे जळ ।
चरण प्रक्षाळण्या कोमळ ।
देहभावाचा अर्घ्य निर्मळ ।
विनीत भावे अर्पीतसे ॥१७॥
सत्कर्मांचे पंचामृतस्नान ।
घालावया अधीर मन ।
कर्मकृष्णार्पणाचे शुद्धोदक स्नान ।
पूर्णोपचार व्हावया ॥१८॥
विमलवाणीचे चंदन ।
श्वासनि:श्वासाचे वस्त्र अर्पून ।
सद्भावांची पुष्पे वेचून ।
सादर करितो गुरुराया ॥१९॥
मीपणाचे धूपखडे वेचिले ।
वैराग्यनिखारी घातले ।
तुमचेपणाचे सुगंध दरवळले ।
गाभारी मनाच्या गुरुराया॥२०॥
अनुसंधानाची निरांजने ।
चेतविली अनुग्रहज्योतीने ।
सदा तेवती आर्ततेने ।
प्रसन्न गुरुमुख पाहावया॥२१॥
नामनैवेद्य वाढिला ।
प्रेमपाण्याने अर्पिला ।
लोभ भिजवूनी ठेविला ।
दक्षिणा म्हणोनी गुरुराया॥२२॥
क्षमायाचनेची अक्षता ।
न्यूनाधिकाची करो पूर्तता ।
मम हृदयी विश्रांती आता ।
सदैव घ्यावी गुरुराया ॥२३॥
जे जे आदरे कल्पिले ।
उपचारी मने अर्पिले ।
मम जीवनी उतरो तेतुले ।
कृपाप्रसादे गुरुराया ॥२४॥
तुमचिया कृपे लाभला दिवस ।
सद्गुरुपूजा घडली खास ।
दीनभक्ताचा मानस ।
मानसी परिपूर्ण जाहला ॥२५॥
॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥