रचना क्र. 7
वार्षिक कृतज्ञता मंत्र व सांगता मंत्र
श्री पेठेकाका · null
null
(आचमन, प्रार्थना )
श्री परमात्म्यास स्मरुनी, देववाणीसही तसे ।
कर्म निर्विघ्न करण्यास, गणेशाला नमू तसे ॥१॥
पूर्वकर्माप्रमाणे मज, लाभला नरदेह हा ।
इतिहास जाणणे,स्मरणे,कर्मे करण्या समर्थ हा ॥२॥
पूर्ण करण्यास प्रारब्धे, प्रयत्ने देव गाठण्या ।
नरदेहापरी साधन, न दुजे हित साधण्या ॥३॥
मला तसे कुणालाही, लाभे दुर्लभ साधन ।
लाभे ज्यांच्या कृपेने ते, स्मरूदे नित्य हे मन ॥४॥
श्राद्धपक्ष तयासाठी, पिंड-तर्पण-भोजन ।
योजिले धर्मकर्त्यांनी, सुसंस्कृत करण्या मन ॥५॥
कर्मे वा साधने, कर्ते, नुरता जे जसे हवे ।
मूळ हेतूस धरुनी, देवमार्ग क्रमू नवे ॥६॥
(संकल्प - देवमार्ग क्रमू नवे)
जन्मदाते पितामाता, प्रपिता आणि पूर्वज ।
कुणालाही जगी वंद्य, संबंध नित्य देहज ॥७॥
तितुकेच श्रेष्ठ संबंधी, पत्नी,श्वशुर, आत्मज ।
त्यांचेही ऋण देहास, नातेवाईक जन्मज ॥८॥
असेच ऋण जीवास, शेजारी, मित्र वा गुरू ।
जगण्यास साह्य सर्वांचे, सदाचे असते सुरू ॥९॥
कृतज्ञ राहणे त्यांचे, आहे मनुजलक्षण ।
नसता कृतज्ञता मग ते, ठरते पशुजीवन ॥१०॥
याहीपुढे मनुष्याचे, ध्येय अंतिम जे असे ।
संपवणे प्रारब्ध या जन्मी, मुक्तिही गाठणे तसे ॥११॥
त्यासाठी सद्गुरू, संत, जे जे अपुल्यास भेटती ।
कृतज्ञता जपणे त्यांची,आजन्म दुर्लभ नित्य ती ॥१२॥
श्रद्धा, कृतज्ञता आणि, कृती हे मर्म यांतिल ।
अर्घ्य तर्पण दाने ही, कर्मे गौण तयांतिल ॥१३॥
उपकारांचा कुणी कर्ता, प्रत्यक्ष असता जगी ।
भावाने कर्म प्रत्यक्ष, त्यांसाठी करणे जगी ॥१४॥
श्रद्धेच्या कृति या श्रेष्ठ, खरी श्राद्धे जगात या ।
आनंदा देत सर्वांना, जगताना जगात या ॥१५॥
कधी ते शक्य ना असते, प्रतिकूल परिस्थिती ।
कधी ना करता येते,व्यक्ती देहात असुन ती ॥१६॥
शुभदिनी, वाढदिवसास, व्यक्त करणे कृतज्ञता ।
अनुकूल म्हणुनी जमले,ओळखणे भाग्य सर्वथा ॥१७॥
मृत्यूनंतरही भाव, उपकार स्मरणे कसे ।
त्यास हा श्राद्ध वा पक्ष,मार्ग गौण असा असे ॥१८॥
आता जे करणे ते ते, प्रतीकात्मक जाहले ।
अर्घ्य द्या,दान द्या त्यात,मुख्य स्मरण हे भले ॥१९॥
सर्वांस आदरे स्मरणे, शुभभाव इथे वसे ।
अशुभ, भय नसे त्यात,प्रेमे ते करणे असे ॥२० ॥
माता वा आप्तसंबंधी, सद्गुरू संत वा कुणी ।
सूक्ष्म या जगती ग्रहण,करती सद्भाव जे मनी ॥२१॥
भूतली वावरती संत, देह ते ठेविती जरी ।
प्रेेमे अर्घ्य तया द्यावा,जागृत ते जगी जरी ॥२२ ॥
कृतज्ञता, शब्द वा श्रद्धा, या खरे कार्य साधिती ।
नसती जे अता देही, तरी त्यांस निवेदिती ॥२३॥
कृतज्ञता तशी कर्मे, मार्ग मोठा अपूर्वही ।
अंतःशुद्धी घडे त्याने, घडे संबंधशुद्धिही ॥२४॥
देहात असता ज्यांनी, संस्कार, उपकार जे ।
दिले त्यामुळे दिसती, जगी दिवस आज जे ॥२५॥
आपुले जीवन समृद्ध, करण्या गुण लाभले ।
स्मरुया आज ते सारे,टिकण्या,जगण्या भले ॥ २६॥
कृतज्ञता दिन हा वार्षिक, जाणुनी मर्म आचरू ।
शुभकर्मे अमावस्या, प्रकाशमय ही करू ॥२७॥
आता पूर्वोक्त भावाने, क्रमाने अर्घ्य अर्पुया ।
अंति या सर्व संतांना, सर्वही अर्घ्य देउया ॥२८॥
(सर्व अर्घ्य देणे, फुले अर्पण करणे, पुढील प्रार्थना म्हणणे)
देवही तृप्त भावाने, तृप्त ते मनुज, संतही ।
देवोत सर्व आशीर्वच,कल्याणा चिंतोत सर्वही ॥२९॥
कर्म करण्यात न्यूनाधिक, त्यासाठी मागतो क्षमा ।
देवहो, पूर्ण करा सर्व, एवढी प्रार्थना तुम्हा ॥३०॥
॥ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥
॥ॐ तत् सत् ब्रह्मार्पणमस्तु ॥
॥विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः ॥
(गुणस्मरणानंतर सांगतामंत्र)
सांगतेचा एक मंत्र
कृतज्ञता गुण हा थोर, श्रद्धेने कर्मि आचरू ।
होण्या कल्याण सर्वांचे, अंती त्या ईश्वरा स्मरू ॥
सद्गुरुनाथ महाराज की जय !
सब संतन की जय !
