रचना क्र. 2
अग्निसंस्काराचे मंत्र
श्री पेठेकाका
॥ॐ॥
सृष्टिच्या चालका हे प्रभु, जन्ममृत्यू तुझी दया।
अगम्य बुद्धीस मनुजाच्या,जाणुनी स्थिर राहुया॥१॥
जगण्यास लागते संधी, लाभते ती तुझ्यामुळे ।
प्रारब्धे आणि कर्तव्ये, घडे उद्धार त्यामुळे ॥२॥
महाभूतांस तू आज्ञा, देउनी देह घडविशी ।
पूर्वकर्माप्रमाणे तो, या लोकी तूच धाडीशी ॥३॥
तुझे स्मरण राखूनी, कर्तव्ये आम्हि आचरू ।
पुन्हा तुझ्याकडे येण्या, सत्कर्मे नित्य ती करू॥४॥
आज आम्ही इथे जमलो, आप्तस्वजन लोकही।
ठेविला देह अमुच्यातिल,ज्यांनी त्यागून सर्वही ॥५॥
आज हा जीव आजन्म, मानवी जन्म लाभुन ।
जगला अमुच्यामध्ये, आप्तस्वजन होउन ॥६॥
जन्मदात्यास, देवास, स्मरून जगला असे ।
आज आज्ञा तुझी होता, देह तो परत देतसे ॥७॥
कर्मे अर्पण होवोत, देहासहित सर्व ती ।
शुद्ध होऊन परमात्मन्, निःशेष बनुदे स्थिती ॥८॥
प्रार्थनापूर्वक हे अग्नी, आहुती तुज देउया।
महाभूतांस ज्याचे ते, देउनी ऋणि राहुया ॥९॥
नेई तुझ्या सवे जीव, देवमार्गावरी अता ।
ज्योतीत ज्योत मिळवी ही,जीवाला दे पवित्रता ॥१०॥
कर्मे निर्दोष या जगती, करिता कधि न होत ती ।
नाम्ना साद्गुण्य भावाने,नामाने,करु पूर्ण ती ॥११॥
॥ श्रीराम ॥
