रचना क्र. 4
तिसऱ्या व अंतिम दिवसाची भूमिका
श्री पेठेकाका
आजच्या या रक्षापूजनाच्या आणि विसर्जनाच्या कार्यक्रमाची भूमिका आता आपण ऐकूया.
‘देह ठेवून नुकत्याच गेलेल्या आपल्यातल्याव्यक्तीबद्दल, कृतज्ञता भाव अर्पण करण्यासाठी, इथं होणाऱ्या या उपासनेला उपस्थित असलेल्या सर्वांना कृतज्ञतेनं अभिवादन. व्यक्तींचा आपल्या आयुष्यात संबंध आल्यावर, त्यात्या संबंधांनुसार वेगवेगळ्या प्रकारचं त्या व्यक्तीचं ऋण आपल्यावर असतं.कालाच्या क्रमानं आणि ईश्वराच्या इच्छेनं, त्या व्यक्तीचं निर्वाण झाल्यावर, आपली परिस्थिती,विचार, देशकालमान यांनुसार, काही कृती करून,त्यांचं आपल्यावर असलेलं हे ऋण फेडणं, हे आपलं एक कर्तव्यच आहे.
त्यासाठी पूर्वापार दोन मुख्य विचारधारा आणि मार्ग चालत आलेले आहेत. एक कर्मांचा आहे आणिदुसरा अनन्य भक्तीचा आहे. कर्मं, कर्मफळं शुद्ध करून पितृमार्गानं जाणं आणि पुन्हा प्रपंचात परतणं,हा आपला एक पितृमार्ग आहे. त्या मार्गाचा विधी,शुभाशुभ, काकस्पर्श, दिवसकार्य अशा स्वरूपाच्या कर्मांच्या बाजूवर जास्त भर आहे, तर भक्तमंडळींसाठी श्री ज्ञानेेश्वर महाराजांसारख्यांनी प्रतिपादन केलेला,सर्वांना समानपणे उपलब्ध असलेला आणि आपल्या प्रस्थानत्रयीतील वेदान्त-उपनिषदं आणि गीतेपासून चालत आलेला पुरातन देवमार्गही आहे.
ईश्वराचं नामस्मरण करून, आपली कर्तव्यंकरून, ईश्वराला ती अर्पण करणं आणि ईश्वराला शरणजाऊन, मृत्यूनंतर त्याच्या कृपेनं पुन्हा ईश्वररूप होणं,हा आपला देवयान मार्ग आहे. हे दोनही मार्ग तसे श्रद्धेचेच आहेत. पण आपल्याला आपल्याआचार धर्मानुसार अधिक अनुकूल वाटतील,काळाप्रमाणं उचित वाटतील, पटतील ते चालण्याचं स्वातंत्र्यही आहे. ईश्वरी कृपेनं भक्तिभावाची ओळख झाल्यानं देवमार्गानं, नामाच्या स्मरणात, देहअग्निसंस्कारानं पृथ्वीला परत करावा आणि आता तिसऱ्या दिवशी त्याची रक्षा प्रतीकरूपानं, प्रार्थनेनं,पूजनानं आणि संतांच्या आशीर्वादानं शुद्ध करून ती भूमीत मिसळून द्यावी, हे या आजच्या अंतिम टप्प्यातल्या संस्कारात अभिप्रेत आहे.
तसंच त्यासाठी पंचमहाभूतांच्या, विशेषतः भूमीच्या, देवाच्या ऋणातून उतराई व्हावं म्हणून,फुलांनी रक्षापूजन करून देवमार्ग चालण्याचा हा प्रयत्न आहे. श्री भगवंतांनी म्हटल्याप्रमाणं-
उपासना जसे करिती, जाती जीव तिथे तसे ।
देवलोकी पितृलोकी, माझे माझ्याकडे तसे ॥(भावगीता अ.९/२५) या वचनाप्रमाणं देह ठेवलेला जीव पूर्ण मुक्त होऊन भगवंतापर्यंत थेट परत जावा, ही मनोमन इच्छा आहे.तसंच श्री ज्ञानेेश्वर माउलींनी खात्री दिल्याप्रमाणं -
मने, वाचा, करणी । देव भजती जे भजनी ।
ते शरीर पडता क्षणी । देवलोकी जाती ॥(समओवी अ.९/३५५) त्यामुळं देवलोकी जाण्यासाठी, श्रद्धेनं केलेल्या आजच्या या विधीमध्ये, कृपया सर्वांनी मनोमन सहभागी व्हावं,अशी सर्वांना नम्र प्रार्थना !
