रचना क्र. 89
रे राघोबा लागलो तुझिया पंथा
श्री आनंदमूर्ती
रे राघोबा लागलो तुझिया पंथा ।
सर्व सोडोनि संसारचिंता ॥धृ॥
आता जाणशील ते तू करी ।
सुखे तारी बा, अथवा मारी ॥
मोक्ष देई का, घालि संसारी ।
तुज धरिले दृढ अंतरी ॥१॥
जे जे करिशी ते ते पाहू ।
जेथे ठेवशील तेथे राहू ॥
सर्व तन मन तुजला वाहू ।
नाम तुझेचि सर्वदा गाऊ ॥२॥
सर्वसाक्षी सर्वही सत्ता ।
सर्व जाणशी तू अनंता ॥
माझे हृदयीची सर्व व्यथा ।
आला आनंद अक्षय हाता ॥३॥
