रचना क्र. 99
सावध व्हा रे सावध व्हा
श्री पेठेकाका
सावध व्हा रे सावध व्हा ।
जाग धरा रे जाण धरा ।
उदंड सोने हिरे उधळितो ।
फुकट मिळाले ध्यानि धरा ! ॥धृ॥
नरदेहाचे सोने मुबलक ।
कष्ट न करिता झालो मालक ।
कसे कुठेही खर्च करावे ।
होइल का हो न्याय खरा ? ॥१॥
जे जे आम्हा मिळते जगती ।
ते इतरांच्या साह्यावरती ।
स्वार्थापुढती सुचे न काही ।
पटेलसा व्यवहार करा ! ॥२॥
बुद्धी शक्ती हिरे माणके ।
दीन म्हणे रे दिली कौतुके ।
दाता आणिक हेतु विसरता ।
ठरेल ना हो पशू बरा ? ॥३॥
