रचना क्र. 112
महाराजांची शाळा
श्री पेठेकाका
महाराजांची शाळा,
अमुच्या महाराजांची शाळा ।
नकळत सकळां वळण लाविते,
तरी लागतो लळा ॥धृ॥
नाही भिंती नाही छप्पर ।
खडू फळा ना कुठले दप्तर ।
ग्रंथ जयाचा तयाबरोबर ।
उघडा आणिक चाळा ॥१॥
घरी, मंदिरी, झाडाखाली ।
झोपडीत वा भरे महाली ।
पसरविते ही प्रेमा आणिक ।
भक्तीच्या परिमळा ॥२॥
पति, पत्नि वा मित्र असू दे ।
बाप लेक वा नात असू दे ।
सगळे शिकती एका ठायी ।
परि धडा वेगळा ॥३॥
विनामूल्य हे अमूल्य शिक्षण ।
कर्तव्याचे अवश्य पालन ।
व्यवहारातिल परमार्थाचा ।
पहा पिकविते मळा ॥४॥
आदी अंती नाम शिकविते ।
समाधान ही पदवी देते ।
तरी पुन्हा शाळेत रहाणे ।
दीन म्हणे सोहळा ! ॥५॥
