रचना क्र. 115
देवा माझा जन्म वृथा भूमिभार
श्री आनंदसागर
देवा माझा जन्म वृथा भूमिभार ।
मुखी निरंतर नाम नाही ॥१॥
नाम नाही मुखी हेचि एक पाप ।
तेथे अनुताप कैचा होय ॥२॥
कैचा अनुताप विषयसांगात ।
मन हे रंगत द्रव्यदारा ॥३॥
द्रव्यदारा हेचि मज वाटे सुख ।
काय आता मुख दाउ संतां ॥४॥
संतां दाउ मुख तो दिन सुदिन ।
जेणे नारायण चित्ती वसे ॥५॥
चित्ती वसे ऐसे कृपा करी कोण ।
श्री ब्रह्मचैतन्य सद्गुरुनाथा ॥६॥
