रचना क्र. 143
नाम घेणार, गाथा वाचणार
श्री पेठेकाका
नाम घेणार, गाथा वाचणार, सत्संगाला येणार ! केव्हा ?
जरा मोकळा होताच देवा तुमची सेवा करणार ! ॥धृ॥
शिक्षण झाले , उद्योग केले
नोकरीसाठी अर्ज केले
चिकटलो की कुठेतरी
चणचण सारी संपणार
आणि जरा मोकळा होताच देवा तुमची सेवा करणार!॥१॥
काट्यावरचे काम माझे
घरीदारी सदा ओझे
लग्नानंतर शेअरिंग होईल
व्याप कमी होणार
आणि जरा मोकळा होताच देवा तुमची सेवा करणार ! ॥२॥
बायकोपोरे घर भरे
पाहुणेरावळे ताप सारे
मार्गी लावले साऱ्यांचे की
व्याप माझा संपणार
आणि जरा मोकळा होताच देवा तुमची सेवा करणार ! ॥३॥
कष्ट काळजी सदा वाही
शरीर सारे पिचून जाई
मलाच नेती दवाखान्यात
बरा होऊन येणार
आणि जरा मोकळा होताच देवा तुमची सेवा करणार ! ॥४॥
दीन म्हणे तळमळीने
मुद्दल नेले प्रपंचाने
दाता राहिला वायद्यावरी
कर्ज कसे फिटणार ?
अशा मधून कोणी काही नाही का हो शिकणार ? ॥५॥
