रचना क्र. 144
पूजा देवा कैची मज घडे तुमची
श्री पेठेकाका
पूजा देवा कैची मज घडे तुमची
करू जाता ऐशी होय दशा ॥धृ॥
करू जाता ध्यान एका ठायी मन
क्षणी जाते भान ध्यान कैचे ॥१॥
बोलाविता तुम्हा हवा भाव पायी
मन शत ठायी आवाहन कैचे ॥२॥
निर्मल हृदयाचे आपणासी आसन
हृदय मलिन कैचे देऊ ॥३॥
सद्भावांची गंगा घालावया स्नान
माझे भाव हीन स्नान कैचे ॥४॥
स्वार्थापायी माझे झिजते शरीर
चंदनाचा उपचार करू कैचा ॥५॥
सत्कर्मांची फुले नाही मजपाशी
दुष्कर्मांच्या राशी फोल होती ॥६॥
आर्त एक भाव हवा तुम्हा पायी
गुंतलो प्रपंची पाही आरती कैची ॥७॥
दीन म्हणे मज खरी पूजा सेवा
घडवावी देवा करुणाकरा ॥८॥
