रचना क्र. 154
धन्य ते संसारी प्राणी उदासीन
श्री निरंजन रघुनाथ
धन्य ते संसारी प्राणी उदासीन ।
निजरूपी मन ठेले ज्यांचे ॥१॥
जयांचिया वृत्ती मागे उलटल्या ।
स्थिती पालटल्या एकसरा ॥२॥
त्याच्या दर्शने जोडे पुण्यराशी ।
स्पर्शिता पायांसी मुक्ति जोडे ॥३॥
निरंजन म्हणे तया शरण जावे ।
स्वकार्य साधावे तया कृपे ॥४॥
