रचना क्र. 4
गुरुतत्त्वतरंगिणी
श्री पेठेकाका
अध्याय : पहिला
जागतरंग
उद्धारास मनुष्याच्या,
गुरुतत्त्वास ठेविले ।
तरंगिणीत ते जाणू,
करू कर्तव्य आपुले ॥१॥
सामान्य जगणे आज,
उठणे, श्रमणे तसे ।
जेवणे, झोपुनी जाणे,
एवढे उरले असे ॥२॥
कोठे रंजन थोडेसे,
थोडे कार्य उदात्तसे ।
परी ते जपुनी स्वार्थ,
लोभतृष्णा मनी वसे ॥३॥
ज्ञान वा वित्त वा अन्न,
कोणी दान करीतसे ।
हौस, हव्यास नावाचा,
प्रसिद्धी त्यातही दिसे ॥४॥
सेवा, शास्त्रे, कला तैसे,
सारे पैशास जोडले ।
शिक्षणे, मंदिरे, देव,
त्यात व्यापार चालले ॥५॥
स्वशब्दाचे नसे मूल्य,
मूल्यांचे मूल्य ना उरे ।
सत्ता, पैसा तसा स्वार्थ,
साधता सर्वही फिरे ॥६॥
त्रिकाळ रोज कोणीही,
करिती मार्गदर्शन ।
त्यास ना लागते ज्ञान,
वा प्रयोगमय जीवन ॥७॥
प्रश्न ना सुटले ज्यांचे,
स्वत:च्या जीवनातले ।
जाती ते सोडविण्या प्रश्न,
लोकांच्या जीवनातले ॥८॥
अंतर्यामी सुसंवाद,
असता जगि येतसे ।
येईल का समूहात,
जे त्याच्या घटकीं नसे ॥९॥
निष्प्रेम जो घरामध्ये,
व्यवसायात वा असे ।
स्वसुखी दक्ष राहून,
अंती दु:खी सदा असे ॥१०॥
पळणे, विसरण्या दु:ख,
रंजने, व्यसने तशी ।
नैराश्ये-मृत्यु-परपीडा,
मानवी हीनता अशी ॥११॥
जो तो वापरतो दुसऱ्या,
वाढे वापर-संस्कृती ।
पक्ष वा मठ वा देश,
वापरास नसे मिती ॥१२॥
देहसौख्य तसे स्वार्थ,
हेच आधार जाहले ।
त्याने अशांतता, भीती,
यांनी जगतास व्यापिले ॥१३॥
सावधान जरी कोणी,
होई या क्षुद्र जीवनी ।
निकृष्टता कळे त्यास,
फोलता जाणवे मनी ॥१४॥
तेच ते जगणे सारे,
दंभ-खोटे निरंतर ।
भेटतो कोणिही कोठे,
जो तो स्वार्थास तत्पर ॥१५॥
जे जे दिसे, घडे ते ते,
खरे मानी जसे तसे ।
समजे पूर्ण स्वत:ला तो,
कृती तैशा करीतसे ॥१६॥
सदगुरू ओळखी ना तो,
इतरां तुच्छ मानितो ।
भ्रमाचे हे जिणे सारे,
जागतो तोचि जाणतो ॥१७॥
खरेखोटे कळे जेव्हा,
पूर्णापूर्ण कळे तसे ।
त्याला सद्गुरुचे कार्य,
कळणे सुरु होतसे ॥१८॥
होतसे जीवनारंभ,
माणसाचा खरा तिथे ।
नि:स्वार्थ-प्रेम-सत्याचा,
शोध होतो सुरू जिथे ॥१९॥
कोठे ते शिकणे सारे,
त्याचे उत्तर 'सदगुरू' ।
ती असो व्यक्ति वा ग्रंथ,
वा ते स्फुरण अंतरी ॥२०॥
जागणे हाचि आरंभ,
गुरुमार्गावरी ठरे ।
गुरुकृपे घडो सर्वा,
हेचि दीना मनी उरे ॥२१॥
जागतरंग नाम
पहिला अध्याय समाप्त ।
अध्याय : दुसरा
पूर्णताशोधतरंग
श्रीमंत जगतामध्ये,
असो कोणी गरीबही ।
निरोगीरोगि वा दुर्बळ,
सत्तावान सशक्तही ॥१॥
नसो वा असु दे काही,
केवढेही कुणाकडे ।
त्यांच्यापाशी असे नक्की,
एक जे त्यांस आवडे ॥२॥
'मीपणा' एक सर्वांत,
आहे भरुन राहिला ।
नकळो वा कळो कोणा,
जीव प्रत्येक ग्रासला ॥३॥
निर्धनास जसा आहे,
तसा धनिकासही असे ।
असो विद्या, नसो विद्या,
मीपणा ठेविला असे ॥४॥
रूपाने श्रेष्ठ कित्येक,
कुरूप जगि जाहले ।
दोघेहि जपती 'मी'स,
कुणी ना 'मी'स सोडले ॥५॥
मीपणा वा अहंभाव,
प्रिय जीवांस वाटतो ।
पूर्णत्वाला परी जाण्या,
तोच जीवांस अडवितो ॥६॥
रूपे घेउन तो नाना,
व्यवहारात आढळे ।
निर्मितो दु:ख अपुल्यात,
तरि थोडाहि ना ढळे ॥७॥
करी माझेतुझे नित्य,
त्यात मी श्रेष्ठ वेगळा ।
होवो अपयशी, दु:खी,
तरी आदर्श मी भला ॥८॥
असो क्षेत्र कुटुंबाचे,
धंदा वा नोकरी असो ।
क्षेत्र अध्यात्म वा शास्त्र,
कला, काव्य कसे असो ॥९॥
वेगळेपण जपण्याची,
इच्छा जीवात निर्मितो ।
सर्वत्र स्वतंत्र अस्तित्व,
ठेवण्या भाग पाडितो ॥१०॥
प्रत्येक माणसाइतुके,
किंवा श्रेष्ठ, गुणी यशी ।
तसे अपयशे असती,
दु:खे मोठी जगी जशी ॥११॥
त्यांतला एक मी आहे,
हे सत्य असते खरे ।
परी मानी पहा जो तो,
माझे दुसऱ्यापरी नसे ॥१२॥
वास्तवात अपूर्णाचे,
नसे का तेच लक्षण ।
शक्तीबुद्धी असो काही,
राहणे हेचि जाणुन ॥१३॥
जाणणे, शोधणे पूर्ण,
जगामध्ये कुठे असे ।
त्यासाठी नम्रता उत्तर,
व्हावे शरण हे असे ॥१४॥
सर्वदा शिकण्याजोगे,
इतरांत जगी वसे ।
गुरुतत्त्वाचे कुणालाही,
तेथ दर्शन होतसे ॥१५॥
दुबळे बाळ कसे असते,
ठेविले दुपट्यावरी ।
शरण ते जात आईस,
गरजा ती पुऱ्या करी ॥१६॥
माणूस दुबळा असतो,
गरजा बदलती जरी ।
अपूर्णता जगामध्ये,
जोवरी साथ त्या करी ॥१७॥
स्वावलंबी जरी होतो,
वाढे वय जसे तसा ।
परंतु ना कधी पूर्ण,
अपुरा तो असे तसा ॥१८॥
एक विद्या जमे त्यास,
जाणी कित्येक ना कधी ।
नसे सत्ता कधी पैसा,
प्रकृती, माणसे कधी ॥१९॥
रेषा नेल्या किती दूर,
मूळ कोन तसा असे ।
व्यापिले वाटते विश्व,
राहाती अंश ते तसे ॥२०॥
जाणणे हे अपूर्णत्व,
मानवी जीवनातले ।
ओळखी जो लघुत्वास,
त्याचे कल्याण जाहले ॥२१॥
लघुत्व जाणण्यामधुनी,
सध्याच्या क्षुद्र जीवनी ।
पूर्णाची लागते ओढ,
देई का ते कुणा कुणी ॥२२॥
भगवंत असे सदा पूर्ण,
दाखवी सद्गुरू भला ।
गुरुतत्त्व पहा सिद्ध,
दाविण्या मार्ग तेथला ॥२३॥
असंख्यात गुरू असती,
विद्या जे देत मानवा ।
ज्ञान, पैसा तसे स्थैर्य,
मिळते त्यांतून या जिवां ॥२४॥
अपूर्ण परी तसे दाते,
देती ते पूर्ण ना असे ।
त्यातून साधते तेही,
अपूर्ण राहते तसे ॥२५॥
अपूर्णता जिथे आहे,
तिथे शांती कधी नसे ।
समाधान तिथे नसते,
मात्र पूर्णात ते वसे ॥२६॥
पिता माता तसे ज्येष्ठ,
विद्यागुरु असंख्यही ।
गुरुतत्त्व असे थोडे,
त्यांच्या रूपात व्यक्तही ॥२७॥
शोधणे गुरुतत्त्वास,
पूर्ण कोठे कसे असे ।
तसे शांतिसमाधान,
का मनी अपुल्या नसे ॥२८॥
शोधण्या जात कोणी जो,
त्याला मदत होतसे ।
मार्गही मिळतो त्यास,
बोधही त्यास होतसे ॥२९॥
पूर्णताशोध नावाचा,
द्वितीयाध्याय संपला ।
जागला दीन जो प्रथमी,
आता शोधास लागला ॥३०॥
पूर्णताशोधतरंग नाम
दुसरा अध्याय समाप्त ।
अध्याय : तिसरा
सदगुरूकार्यतरंग
जागतो जाणतो जीवन,
तशी त्याची अपूर्णता ।
जाणो जगो अभिप्राय,
तरंगी तत्त्व शोधता ॥१॥
अपूर्ण मानवी जीवन,
कर्ता कर्म अपूर्णसे ।
त्याला लाभे कसे पूर्ण,
तो कैसा पूर्ण होतसे ॥२॥
चालतो जगतामध्ये,
मेळ अदृश्यदृश्य हा ।
अव्यक्त होतसे व्यक्त,
आकारा येउनी पहा ॥३॥
झाडेपेडे, घरे, वस्तू,
कित्येक जगतात या ।
माणूस हाहिआकार,
दिव्य शक्ती दिल्या तया ॥४॥
परी ना ओळखी, जाणे,
काय झेप तयाकडे ।
अदृश्य गाठणे शक्य,
क्षुद्र दृश्य तयापुढे ॥५॥
आगळा अंतरी होय,
जाणीना सहसा तसे ।
पूर्णास जाणणे शक्य,
होणे पूर्ण तया असे ॥६॥
दृश्यास मानुनी सत्य,
जो तो आयुष्य चालवी ।
परी मोडे घडे ते ते,
जे जे आकार व्यक्तवी ॥७॥
जसा माणूस हा दृश्य,
आकारे वेगळा असे ।
वेगळेपण त्या वाटे,
जपावे ते स्वतंत्रसे ॥८॥
बोलता, चालता, जगता,
वेगळा मी असेन ना ।
मते, कार्ये, घरे, वस्तू,
माझ्या असतील भिन्न ना ॥९॥
चिंतेने या सदा ग्रासे,
कृती तैशा करीतसे ।
यातील भ्रम जाणीना,
वृद्धत्वा जरि येतसे ॥१०॥
आकारे वेगळा होतो,
प्रारब्धे जरी मानव ।
अंतरी तो असे एक,
जोडली सर्व जाणिव ॥११॥
दृश्यातही दिसे भिन्न,
जरी प्रत्येक आकृती ।
त्यांतही साम्यता मोठी,
देते सर्वांस प्रकृती ॥१२॥
मानवे निर्मिले सारे,
भाषासंस्कार भेद हे ।
त्याने तो वेगळा भासे,
भेद ना मूळ येथ हे ॥१३॥
वेगळेपण सौख्याचे,
वाटे सर्वांस ते जरी ।
व्यवहारार्थ ते लागे,
तेवढे कार्य ते करी ॥१४॥
बसणे जपत ते पुढती,
सुखाचा भ्रम तो असे ।
म्हणुनी देतसे दु:खा,
जो जो जपत त्या असे ॥१५॥
साधर्म्य अंतरी असते,
एक निर्जीव जीवही ।
शोधता ते कळे सर्वां,
अनुभवा येत प्रत्यही ॥१६॥
बोधण्या ते मना सारे,
शोधण्या बळ लागते ।
सदगुरू आगळी शक्ती,
मुक्तिमार्गास दाविते ॥१७॥
वेगळेपण बंधाचे,
एकत्वी मुक्ति होतसे ।
प्रामाणिक असे त्याला,
विचारे बोध होतसे ॥१८॥
परी अनुभवा येण्या,
तैसे सारे स्थिरावण्या ।
लागती सदगुरू तेथे,
ऐसे अद्वैत जाणण्या ॥१९॥
जमते कार्य कुठलेही,
स्वप्रयत्ने कुणासही ।
परंतु पाहणे दुष्कर,
अहंकारास प्रत्यही ॥२०॥
अणुरेणूहुनी सूक्ष्म,
मीपणा हा किती असे ।
सदगुरू लागती त्यास,
जाणण्या, जाळण्या तसे ॥२१॥
उद्धारास व्यवस्था ही,
भगवंताची कृपा असे ।
गुरुतत्त्व निराकार,
सदगुरू प्रतिनिधी असे ॥२२॥
हाती सद्गुरुनी धरिता,
आत्मदर्शन होतसे ।
वेगळेपण, द्वैताचा,
भ्रम हा नष्ट होतसे ॥२३॥
प्रयत्ना साह्य ते होती,
दक्ष सांभाळ करावया ।
प्रतिक्षणी सावधान,
राखून करिती दया ॥२४॥
द्वैत बंधन जाताच,
सर्व पूर्ण जगी दिसे ।
अपूर्ण जग ते आता,
अवघे पूर्ण होतसे ॥२५॥
प्रेमाने जोडिले जाते,
चैतन्ये सांधले असे ।
जातसे क्षुद्रता सारी,
आनंद भरुनी वसे ॥२६॥
व्यक्तापुढील अव्यक्त ,
अद्वैत भगवंत तो ।
अनुभवा आणुनी सदगुरू,
मुक्तिचे कार्य साधितो ॥२७॥
विदेही, प्रेमि, नि:स्वार्थी,
निरपेक्ष तसा असे ।
जीव-उद्धार हा ध्यास,
भूतली ईश जो असे ॥२८॥
गुरुतत्त्वव्यवस्था ही,
सर्वांना लाभली असे ।
गाठोत सर्व पूर्णत्व,
शोधुनी सदगुरू तसे ॥२९॥
सर्वांना सदगुरू लाभोत,
तशी जीवांस मुक्तता ।
स्वानंदे सर्व नांदोत,
तीच दीनास धन्यता ॥३०॥
सदगुरुकार्यतरंग नाम
तिसरा अध्याय समाप्त ।
श्रीसदगुरूचरणार्पणमस्तु ।
ॐ तत् सत् ॥
