रचना क्र. 5
सृष्टिसंदेश
श्री पेठेकाका
१ / तळमळीचे शब्द
माझ्यातले नवल हे, रे माणसा तू ।
श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतू ॥
बुद्धीविवेक किति हे स्थलकालभान ।
कर्ता खरा तुज कळे तो देव कोण ॥
विध्वंस दु:ख तरिही किति जीवनात ।
वाटे विषाद म्हणुनी हे शब्द येत ! ॥धृ॥
२ / जरा ताडून पहा
कोठे कधी मम कसा आरंभ झाला ।
विस्तार कोठवरि हा आहे पसरला ॥१॥
लागेल अंत कधि ना गवसेल माप ।
तू पाहशील जरि हे माझे स्वरूप ॥२॥
तू जातशी बुडुनिया तव कौतुकात ।
पाही किती उरत ते या आरशात ॥३॥
३ / आनंद का नाही ?
कोठेहि जीव असु दे मी देव मानी ।
तो पर्वतावरि असो वा माळरानी ॥१॥
नसता मला कुठुनही मिळणार काही ।
प्रेमे तयास नित मी जगवीत राही ॥२॥
स्वार्थास जपत जगण्या तव जन्म जाई ।
सेवा नसे म्हणुनि रे आनंद नाही ! ॥३॥
४ / द्वेषाशिवाय जगा
माझ्यात पर्वत किती त्या टेकड्याही ।
मैलोगणीक जमिनी खोरी दऱ्याही ॥१॥
ते तोलताल मिळुनी सांंभाळतात ।
माझे स्वरूप सगळे प्रेमे राहात ॥२॥
तैसे कमी अधिक वा तुमच्यांत असते ।
द्वेषाशिवाय जगणे का शक्य नसते ? ॥३॥
५ / अर्पण करण्याजोगे काय ?
ज्याने मला घडविले नाना रुपात ।
त्याच्यात ये जड तसे चैतन्य येत ॥१॥
चैतन्यवर्ग करितो स्थूलास माया ।
माझी फुले उमलती देवास द्याया ! ॥२॥
हा स्थूल देह धरुनी करितोसि कर्मे ।
देण्यास योग्य किति रे देवास प्रेमे ? ॥३॥
६ / अतिसंचयाने दु:ख होते
झाडांस वाढ करण्या दे ऊन वारा ।
माळावरीहि झरती मम प्रेमधारा ॥१॥
मी भूक देत, तरिही अन्नाहि देत ।
ज्याला तहान दिधली, जल त्यास देत ! ॥२॥
तुम्ही कशास भुलता अतिसंचयास ।
करता अकारण तुम्ही दु:खी स्वत:स ? ॥३॥
७ / नदीकाठी कोरडा
जन्मून पर्वतशिरी मम श्रेष्ठ स्थानी ।
निघते नदी स्वकुळ अन् घर ते त्यजोनी ॥१॥
साही विरोध, श्रम परि, दे जीवनास ।
नि:स्वार्थ जगुन मिळते ती सागरास ॥२॥
ना त्याग, ना कृति नसे, ना ध्येय, आच ।
काठी जगून मनुजा का कोरडाच ? ॥३॥
८ / जगून जगवा
पाणी मुळे टिपुन ते खोडास देती ।
शेंड्यास पान तरि ते जल तेथ नेती ॥१॥
निर्लोभ मूळ किति ते नयना न दिसते ।
सृष्टी जगून जगवी आनंद देते ॥२॥
समृद्ध माणुस तरी दुसऱ्या न देई ।
लोभी, विपन्न अवघे दु:खात नेई ॥३॥
९ / ठायीच स्वधर्म
एका स्थळी असुन जे कर्तव्यदक्ष ।
छाया फळे सुमनही देतात वृक्ष ॥१॥
चाले स्वमार्ग तरिही नदि देत सारे ।
तो सूर्य जीव जगवी आहे तिथुन रे ॥२॥
का हिंडतोस जगती करण्या भल्याचे ?।
ठायी स्वधर्म जगता हित हो जगाचे ! ॥३॥
१० / निरपेक्ष कर्तव्य
बीजे कुठून कसली देवोत देव ।
सांभाळ वाढ करिते ओतून जीव ॥१॥
जे जे जरूर पडते ते दे जिवास ।
येवोत पुष्प फळ वा काटे तयास ! ॥२॥
जे कार्य, माणुस, स्थिती वाट्यास येते ।
ती जाणुनी करित जा कर्तव्य ते ते ॥३॥
११ / फलत्याग
झाडे कितीक असती या भूमिवरती ।
कष्टा अपार करुनी मी वाढवी ती ॥१॥
पुष्पे फळे धरत मग घेते कुणी ते ।
कोणी जरी न नेता मी त्यागते ते ! ॥२॥
कर्तृत्व पूर्ण घडता अपुले न उरते ।
दिधल्या कुणा फळ खरा आनंद देते ! ॥३॥
१२ / दुसर्यांसाठी कर्मे किती ?
भूमी जलात पुरवी सर्वांस माया ।
आभाळ होत धरिते सर्वांस छाया ॥१॥
मी तेजवायु पुरवी सर्वां जगाया ।
कर्मे अखंड करिते आनंद द्याया ! ॥२॥
पाही किती जगविशी दुसऱ्यास प्रेमे ।
दुसऱ्या जिवा जगविण्या किति होत कर्मे ?॥३॥
१३ / आनंंद जवळ आहे
भूमी सपाट असु दे की डोंगराळ ।
वा कोरडा दिसतसो विस्तीर्ण माळ ॥१॥
कोठेहि खोल खणता पाणी जिवंत ।
सर्वत्र साध्य वश तो भगवंत होत ! ॥२॥
का मानवा विसरशी, ना हाक देशी ।
सन्नीध देव असुनी दु:खात असशी ? ॥३॥
१४ / ना प्रौढी ना प्रचार
रंगांस घेउन किती पुष्पे उमलती ।
दैवी सुगंध सकळा ती देत जाती ॥१॥
ना सांगती कधि कुणा कोठे न फिरती ।
ज्या रंगगंध कळती ते धाव घेती ॥२॥
सत्कार्य सद्गुण सदा मिळवीत जावे ।
प्रौढी प्रचार कसले, तू का करावे ? ॥३॥
१५ / परिपक्वता
या टेकडीवरि जरा ये तू चढूनी ।
पाही इथे फुलत जे, पाही न कोणी ॥१॥
वाराहि वाहत उन्हे पडतात येथे ।
पाही न कौतुक करी कोणी न जेथे ॥२॥
मनुजा तुला किति हवी स्तुति वा प्रशंसा ।
परिपक्व तू असुन रे भगवंत-अंशा ॥३॥
१६ / सृष्टिचक्राचे मर्म
सोशीत पर्वत उभे या ऊष्ण ज्वाळा ।
झाडे उभी कितिक या सोशीत धारा ॥१॥
सोशीत सृष्टि अवघी अति थंड वारे ।
हे सृष्टिचक्र फिरण्या सोशीत सारे ॥२॥
अस्वस्थ किंचित तुला कधि त्रास होता ।
करण्यात सहन सगळे ये मर्म हाता ! ॥३॥
१७ / उत्कृष्टतेचा ध्यास
झाडे असोत झुडुपे वेली असोत ।
पूर्णात पूर्ण घडण्या करतात कष्ट ॥१॥
उंचात उंच बनण्या वरि धाव घेती ।
जे पान, फूल, फळ, ते उत्कृष्ट देती ॥२॥
रे चालते तुज कसे निकृष्ट कर्म ?।
उत्कृष्टता असुनही सृष्टीत धर्म ! ॥३॥
१८ / देव होई
दगडात येथ कुठले चैतन्य नाही ।
खाणीत भूमिवरती पडुनीच राही ॥१॥
सोशी कधी कुणि तया जे घाव देई ।
त्यातून चेतन पहा तो देव होई ॥२॥
तू श्रेष्ठ, त्यात तुजला घडवीत देव ।
का देव तू न होशी ? बदली स्वभाव ! ॥३॥
१९ / शोधूनि पाहे
दे सागरास फिरुनी, आभाळ, पाणी ।
जमिनीस वृक्ष शमवी छाया धरोनी ॥१॥
पुष्पे सुगंध फिरूनी सृष्टीस देती ।
घेती जरी सकळ हे परतोनि देती ॥२॥
रे मानवा, प्रतिदिनी घेतोसि आहे ।
देशी फिरून किति ते शोधूनि पाहे ! ॥३॥
२० / नवजीवनाची उमेद
येवोत वादळ कधी खवळो समुद्र ।
वणव्यात तांडव करो कधि मृत्यु रुद्र ॥१॥
नेमे सकाळ फिरुनी करि स्वागतास ।
येथे उमेद सकळा नवजीवनास ॥२॥
रे तू किती विवेकी ते तूच पाही ।
नैराश्य, मरगळ तुझ्या का जीवनी ही ? ॥३॥
२१ / सर्व जोडलेले
दिसते कुणी जड तसे काही सचेत ।
कोणी म्हणोत असती माझ्यात भेद ॥१॥
दु:खासुखात जड चेतन जोडले रे ।
अस्तित्व एक सगळे हे जाण तू रे ॥२॥
तू माणसास तरि रे जोडून राही ।
ही सृष्टि एक सगळी ध्यानात घेई ! ॥३॥
२२ / अंतर, कर्तव्य व गती
तो सूर्य थोर जगवी जगि सर्व जीवा ।
पाणी जमीन करिती उपकार सर्वा ॥१॥
तारे कितीक ग्रह हे भ्रमणी रहात ।
राखून तोल जपती नित अंतरास ॥२॥
दूरस्थ निकट तुज रे लागे रहावे ।
कर्तव्य नित्य करुनी गतिशील व्हावे ! ॥३॥
२३ / वैविध्य आणि नवता
माझ्यात फूल अवघे बनते नवीन ।
पानात रेष रचिते प्रतिभा जपून ॥१॥
झाडासमान न करी मी झाड दुसरे ।
वैविध्य आणि नवता मम जीवनी रे ॥२॥
ते ते ठरीव जगशी, तू बद्ध होशी ।
आनंद ना उरतसे, का यंत्र होशी ? ॥३॥
२४ / संवाद व आनंद
मोरांत नर्तन असे, पशु मंत्र गाती ।
ध्यानस्थ पर्वत, कडे, झाडेहि होती ॥१॥
पुष्पांत आरति करी बघ वेलमाय ।
करुणाष्टके म्हणतसे नेत्रांत गाय ॥२॥
संवाद सर्व करिती तू दूर का रे ?।
आनंद सृष्टिमधला जाणून घे रे ॥३॥
२५ / रोजची जपणूक
बागेत झाड उगवो वा माळरानी ।
पक्षी असोत इवले वा सिंह कोणी ॥१॥
जगण्यास सर्व पुरवी जपणूक रोज ।
जैसा नवीन जुळला संबंध आज ! ॥२॥
तू काळजी करित का तव माणसांची ।
संबंध आज जुळला समजून त्यांची ? ॥३॥
२६ / कृत्रिम आनंद नको
येथे असो दगड वा पाचू कुठेही ।
सगळे खरे विमल हे, नकली न काही ॥१॥
आनंद, सर्जन इथे पाही कुठेही ।
निर्मूल्य प्रेम इथले प्रभुची कृपा ही ॥२॥
आनंद कृत्रिम किती का तू मिळविशी? ।
आनंदरूप असता मी तूजपाशी ! ॥३॥
२७ / नम्र आस
शिकण्यास सर्व दिधले सर्वेश्वराने ।
सृष्टीत मांडुन किती मोठ्या मनाने ॥१॥
संदेश - स्पंदन सदा सृष्टीत होई ।
जे अल्पबुद्धि शिकले ते दीन देई ॥२॥
कर्त्यास प्रार्थित तसे अन् माणसास ।
न्यूनाधिका क्षमावे ही नम्र आस ॥३॥
-- सृष्टिमाता की जय --
