रचना क्र. 202
नामदीप हाती दिला
श्री पेठेकाका
नामदीप हाती दिला ।
जन्म पावन हो केला ॥धृ॥
किती दाटला अंधार ।
जन्मोजन्मीचा हा फार ।
बिकटशा वाटेवर ।
नामे प्रकाश हो आला ॥१॥
विषयांची बहु राने ।
पार केली सुखाशेने ।
भ्रम नाशिले नामाने ।
सत्य मार्ग कळो आला ॥२॥
खऱ्या देवाची हो ओढ ।
नामे सत्संगाची जोड ।
शुद्ध कर्माची आवड ।
घरी आनंद हो आला ॥३॥
किती गुरू हा दयाळ ।
करी नामाने सांभाळ ।
दीन म्हणे देव जवळ ।
याच नामाने हो झाला ॥४॥
