रचना क्र. 245
आता तरी सावधान
श्री रामदास स्वामी
आता तरी सावधान ।
अर्थीं घालावे मन ।
आपुले समाधान ।
तेचि करावे साधन ॥धृ॥
प्रपंचा लाथलावे ।
आधी विद्यावंत व्हावे ।
उदंडचि मेळवावे ।
मग सुखे भोगावे ॥१॥
आधी कष्ट मग फळ ।
ऐसे बोलती सकळ ।
कष्टे ना येक पळ ।
तेणे होय ओंगळ ॥२॥
जिणे दो दिसांचे ।
तेणे माणुस काचे ।
जाणते सगुणाचे ।
ऐसे मिळेल कैचे ॥३॥
आपण सुखी होती ।
लोक सुखी करिती ।
ऐसी हे शुद्ध मती ।
तेणे पावती गती ॥४॥
इहलोक, परलोक ।
सर्व करावे सार्थक ।
लोकांमध्ये अलौकिक ।
ऐसा करावा विवेक ॥५॥
विचाराची शुद्धि ऐसी ।
सुखी करावे सर्वांसी ।
स्त्रीपुरुष दासदासी ।
अवघी करावी विलासी ॥६॥
दास म्हणे ऐसा व्हावा ।
सुखे संसार करावा ।
काहीच नाही गोवा ।
पंथ देवाचा धरावा ॥७॥
