रचना क्र. 267
तरावे बुडावे तुझिया वचने
श्री तुकोबा
तरावे बुडावे तुझिया वचने ।
निर्धार हा मने केला माझ्या ॥धृ॥
विश्वास धरूनि राहिलो निवांत ।
ठेवूनिया चित्त तुझेपायी ॥१॥
न कळे हे मज साच चाळविले ।
देसी ते उगले घेइन देवा ॥२॥
मागणे ते सरे ऐसे करी देवा ।
नाही तरी सेवा सांगा पुढे ॥३॥
करावे काही की पहावे उगले ।
तुका म्हणे बोले पांडुरंगा ॥४॥
