रचना क्र. 268
विठ्ठल हे मूर्ती साजिरी सुंदर
श्री तुकोबा
विठ्ठल हे मूर्ती साजिरी सुंदर ।
घाली निरंतर हृदयपुटी ॥धृ॥
गंगेचिया अंताविण काय चाड ।
आपुले ते कोड तृषेपाशी ॥१॥
कारण ते असे नवनीतापाशी ।
गबाळ ते सोशी इतर कोण ॥२॥
बाळाचे सोईते घास घाली माता ।
अट्टाहास चिंता नाही तया ॥३॥
गाऊ नाचो करू आनंदसोहळा ।
भावचि आगळा नाही आता॥४॥
तुका म्हणे अवघे झाले एकमय ।
परलोकीची काय चाड आता ॥५॥
