रचना क्र. 455
मढे झाकुनिया करिती पेरणी
श्री तुकोबा
मढे झाकुनिया करिती पेरणी ।
कुणबियाचे वाणी लवलाहे ॥१॥
तयापरी करी स्वहित आपुले ।
जयासी फावले नरदेह ॥२॥
ओटीच्या परीस मुठीचे वाढे ।
यापरी कैवाडे स्वहिताचे ॥३॥
नाही काळसत्ता आपुलिये हाती ।
जाणते हे गुंती उगविती ॥४॥
तुका म्हणे पाहे आपुली सूचना ।
करितो शहाणा मृत्युलोकी ॥५॥
