रचना क्र. 500
जग हा प्रभुसत्ता दरबार
श्री पेठेकाका
जग हा प्रभुसत्ता दरबार ||
ज्याचा त्याला न्याय तसा प्रभू ,
कण तोलून करणार || धृ||
वाटे राजा, कसा रंक कुणि |
दुर्दैवी वा भाग्यवंत कुणि |
प्रभूसत्तेने फळे तयांना |
जशी तशी मिळणार ||१||
कर्म येतसे फळ घेवोनी |
कधि जन्मांतरि येते उगवुनि |
काळ फळाचा कधीहि येवो |
न्याय अचूक होणार ||२||
स्वार्थ, असत्ये नटती जगती |
जन पैशाला कितीक भुलती |
असत्य वाटा अंती जगती |
जन्म विफळ करणार ||३||
सत्कर्मांची वाट प्रभूची |
दुर्गम वाटे तरी सत्याची |
दीन चालला मनी धरोनी |
सत्य तेच तरणार ||४||
