रचना क्र. 520
शांत हो श्री गुरुदत्ता
श्री टेंब्ये स्वामी महाराज
शांत हो श्री गुरुदत्ता,
मम चित्ता शमवी आता |
तू केवळ माता जनिता,
सर्वथा तू हितकर्ता |
तू आप्त स्वजन भ्राता,
सर्वथा तूचि त्राता |
भयकर्ता तू भयहर्ता,
दंडधर्ता तू परिपाता |
तुजवाचुनि न दुजी वार्ता,
तू आर्तां आश्रयदाता |
मम चित्ता शमवी आता || १ || शांत हो...
अपराधास्तव गुरुनाथा,
जरि दंडा धरिसी यथार्था |
तरि आम्ही गाउनि गाथा,
तव चरणी नमवू माथा |
तू तथापि दंडिसी देवा,
कोणाचा मग करु धावा |
सोडविता दुसरा तेव्हा,
कोण दत्ता आम्हा त्राता |
मम चित्ता शमवी आता || २ || शांत हो...
तू नटसा होउनि कोपी,
दंडिताहि आम्ही पापी |
पुनरपिही चुकत तथापि,
आम्हावरि नच संतापी |
गच्छतः स्खलनं क्वापि,
असे मानुनि नच हो कोपी |
निजकृपालेशा ओपी,
आम्हावरि तू भगवंता |
मम चित्ता शमवी आता || ३ || शांत हो...
तव पदरी असता ताता,
आडमार्गी पाउल पडता |
सांभाळुनि मार्गावरता,
आणिता न दुसरा त्राता |
निजब्रिदा आणुनि चित्ता,
तू पतीतपावन दत्ता |
वळे आता आम्हावरता,
करुणाघन तू गुरुदत्ता |
मम चित्ता शमवी आता || ४ || शांत हो...
सहकुटुंब सहपरिवार,
दास आम्ही हे घरदार |
तव पदी अर्पु असार,
संसारसहित हा भार |
परी हरिसी करुणासिंधो,
तू दीनानाथ सुबंधो |
आम्हा अघलेश न बाधो,
वासुदेव प्रार्थित दत्ता |
मम चित्ता शमवी आता || ५ || शांत हो...
