रचना क्र. 521
सुख वाटे तुझे
श्री तुकोबा · null
null
सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे।
प्रेममिठी पडे वदनासी ।।१।।
व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी।
आला दुराचारी पारधी तो ।।२।।
वृक्षाचिया माथा बैसला ससाणा।
धनुष्यासी बाणा लावियेले ।।३।।
तयेकाळी तुज पक्षी आठविती।
धावे गा श्रीपति मायबापा ।।४।।
उडोनिया जाता ससाणा मारील।
बैसता विंधिल पारधी तो ।।५।।
ऐकोनिया धावा तया पक्षियांचा।
धरिला सर्पाचा वेष वेगी ।।६।।
डंकोनि पारधी भूमिसी पाडिला।
बाण तो लागला ससाण्यासी ।।७।।
ऐसा तू कृपाळ आपुलिया दासा।
होशील कोवसा संकटीचा ।।८।।
तुका म्हणे तुझी कीर्ति त्रिभुवना।
वेदाचिया वाणी वर्णवेना ।।९।।
