रचना क्र. 1
ईशसाधन मंत्र
श्री पेठेकाका · null
null
१ . अग्निमंत्र
हे विश्व ज्यातुनी येते, चालते, लय पावते ।
निराकारास त्या स्मरुनी, नमितो सृष्टिदेवते ॥१॥
ब्रह्माविष्णुमहेश्वरही, गणेश, कुलदेवता ।
वंदितो सद्गुरू, संत, ईश्वरीमार्गदेवता ॥२॥
आकाशी संचरे वायू, साह्य अग्नीस जो करी ।
प्रकाशक तशा दाहक, अग्नीला नमन मी करी ॥३॥
अग्नीतून जलप्राप्ती, जीवनाधार सृष्टिला ।
मातृरूप नमी पृथ्वी, सर्व जे लाभले मला ॥४॥
बाहेर अंतरी असशी, अग्नी हे अतिपावना ।
प्रार्थना करितो तुजला, घडवी शुद्ध साधना ॥
इच्छा, खाणे, पिणे, फिरणे, कर्मे वा साधने असो ।
विकार, भय, अज्ञान, देवाआड कुणी नसो ॥६॥
आड माझ्यामध्ये ऐसे, ते जाळुनि कृपा करी ।
आता प्रकाशवी मार्गा, नेई जो थेट अंतरी ॥७॥
आनंदे सर्व प्रारब्धे, संपवण्या शक्ति दे मला ।
दाखवी देव माझ्यातिल, तसा सर्वांतरातला ॥८॥
भेद, स्वार्थ, दुर्बुद्धी, लवलेश नसो मनी ।
प्रकाश जीवनी देई, अंती ईश्वर गाठुनी ॥९॥
॥ अग्नये नमो, अग्नये नमो, अग्नये नमः ॥
२ . ईशावास्य सममंत्र
ॐ पूर्ण ते, पूर्ण हे सारे, पूर्णातुन पूर्ण येतसे ।
काढता शून्य शून्यातुन, शून्य शेष जसे असे ॥
ॐ शांति: शांति: शांति: ।
ईश्वरे व्यापिले सर्व, त्यागुनी मग भोग तू ।
परधनाची नको आशा, न करी अपहार तू ॥१॥
आयुष्य शत इच्छावे, परी कर्मांत राहुनी ।
कर्मे न बांधती तुजला, दुजा मार्ग न याहुनी ॥२॥
फिरविती पाठ आत्म्यास, प्रकाशास तशा तया ।
जाती ते आसुरी लोकी, अंधारे वेढले जया ॥३॥
मनापलिकडे वेग, स्थिर परि गतिकारक ।
प्राप्य ना इंद्रिय-देवांना, सृष्टीला प्राणदायक ॥४॥
हालचाल करी, न करी, राही जवळ दूरही ।
बाहेर अंतरी आत्मा, दिक्कालातीत आतही ॥५॥
स्वत:त सर्व जगताला, जगती स्वत:सही ।
पाही, तो कधि न कंटाळे, कोणासही कशासही ॥६॥
जग ज्यास आपुले झाले, सर्वत्र भरुन जो असे ।
नित्य एकत्व झाल्यास, मोह शोक कुठे कसे ? ॥७॥
अशरीर शुद्ध निष्पाप, निर्मलात्मा अलिप्तही ।
मुक्त सार्थ शाश्वतता, देतो तो व्यापकत्वही ॥८॥
अज्ञानी, कर्म आचरिती, अंधारात प्रवेशती ।
ज्ञानी जे रमती तेही, अंधारीच प्रवेशती ॥९॥
अज्ञानापलिकडे प्राप्य, ज्ञानापलिकडे तसे ।
अनुभवी पुरुषांकडुनी, ऐकिले ते असे, असे ॥१०॥
अज्ञानज्ञान दोन्हींसह, आत्मज्ञानास जाणतो ।
अज्ञाने नाश टाळूनी, ज्ञानाने मुक्त होत तो ॥११॥
व्यक्तास उपासती जे ते, अंधारात प्रवेशती ।
अव्यक्ती रमती तेही, घोर तमी प्रवेशती ॥१२॥
व्यक्तापलिकडे तत्त्व, अव्यक्तापलिकडे तसे ।
विवरिले घडविले दर्शन, त्यांचे हे सांगणे असे ॥१३॥
व्यक्त अव्यक्त दोन्हींसह, आत्मतत्त्वास जाणती ।
व्यक्ताने तरुनी मृत्यू, अव्यक्ते मुक्ति पावती ॥१४॥
सोन्याने झाकले सत्य, पात्र बाजूस ते करी ।
दर्शना सत्यसूर्याच्या, कृपा ही प्रभु तू करी ॥१५॥
प्रजापति यमा सूर्या, पसरी, किरण आवरी ।
कल्याणरूप तव पाही, मी आहे तेच अंतरी ॥१६॥
वायूत मिसळुनी प्राण, भस्म हो देह नश्वर ।
मना मात्र स्मरी कर्मे, अंती तो परमेश्वर ॥१७॥
जाणत्या अग्नि तू नेई, आम्हाला भोगण्या फला ।
पापबुद्धीस जाळी तू, नमस्कार असो तुला ॥१८॥
ॐ पूर्ण ते, पूर्ण हे सारे, पूर्णातुन पूर्ण येतसे ।
काढता शून्य शून्यातुन, शून्य शेष जसे असे ॥
ॐ शांति: शांति: शांति: ।
