रचना क्र. 9
नामनिवेदनमाला
श्री पेठेकाका · null
null
(कोणत्याही वैयक्तिक किंवा सामूहिक
जपसांगताप्रसंगी म्हणण्यासाठी)
मंगलमूर्ती मोरया ।
बुद्धिदायका सदया ।
नामनिवेदन निर्विघ्न कराया ।
यावे विघ्नेश्वरा गणराया ॥१॥
अव्यक्त गुरुपदासि वंदन ।
व्यक्त सद्गुरूंचे स्मरण ।
संतसत्पुरुषांचे चरण ।
भक्तिभावे नमिले ॥२॥
स्थूलसूक्ष्मादि देव ।
थोर भक्तांचे समुदाव ।
विशेष धरिला आदरभाव ।
अपुल्या अपुल्या गुरुपायी॥३॥
कठीण काळाचे गणित ।
उभा देहबुद्धीचा पर्वत ।
उल्लंघोनि आम्हा दिसत ।
दिवस आज भाग्याचा ॥४॥
जे जे नाम घडले ।
ते अत्यादरे आणिले ।
सांगता प्रसंगी ठेविले ।
कृतज्ञतेने तव पाया ॥५॥
नाम घडणे ही कृपा साकार ।
त्यात सत्संगाचा आधार ।
सात्त्विक व्यक्तिगत निर्धार ।
विशेष वाटे मनाला ॥६॥
अल्पबुद्धीने नाम घडले ।
असो सदोषनिर्दोष भले ।
ते नाम आजि निवेदिले ।
प्रेमादरे भगवंता ॥७॥
राहुनी कर्तव्यी तत्पर ।
नाम स्मरू निरंतर ।
नामधर्म हा आचार ।
आम्हा ठायी सदा वसो ॥८॥
अधिकउण्यासी क्षमा करणे ।
अखंड नामप्रेमा देणे ।
नवे संकल्प तडीस नेणे ।
इतुके मागणे भगवंता ॥९॥
॥ श्री सदगुरूनाथ महाराज की जय ॥
॥ सब संतन की जय ॥
