रचना क्र. 10
शांतिमंत्र
उपनिषदांतून · null
null
॥ शांतिमंत्र ॥
ईश्वरे उपनिषदांतून,
मंत्र पावन गाइले ।
चित्तात आणि विश्वात,
राहण्या शांति हे दिले ॥
ओंकार स्मरुन उच्चारी,
आता वाणीतुनी जसे ।
जे, जे मनामधे राही,
तेच वाणीमधे असे ॥१॥
मनात जे असे तेच,
वाणीमध्ये सदा वसो ।
वाणीत येतसे तेच,
मनी माझ्या सदा असो ॥२॥
प्रकाशमय हे आत्मन्,
आवाहन तुला करी ।
प्रकटून मज दे दर्शन,
प्रार्थना ही तुला करी ॥३॥
एकत्व पावलेल्या हे,
माझ्या वाणी-मना तुम्ही ।
जाणण्या आत्मस्वरुपाला,
व्हावे तत्पर, समर्थ मी ॥४॥
आत्मस्वरूऽप माझ्याशी,
बोलूदे व्यक्त होउनी ।
श्रवण आणि अध्ययन,
घडो तादात्म्य होउनी ॥५॥
हे आत्मज्ञान जे झाले,
सत्य जे ऐकिले असे ।
ते ना त्याग करो माझा,
असो जागृत जसे तसे ॥६॥
सत्याचे, आत्मस्वरुपाचे,
अध्ययन करीन मी ।
रात्रंदिवस मननाने,
नित्य हे टिकवीन मी ॥७॥
बोलेन युक्त ते शब्द,
वदे मी सत्य नित्य ही ।
देव रक्षण करो माझे,
त्या शब्दांचे सदैवही ॥८॥
ते सत्य आणि सद्ब्रह्म,
सदैव रक्षण करो ।
सत्यरूप परमात्मा,
तो माझे रक्षण करो ॥९॥
जो जो सत्य वदे त्याचे,
सदैव रक्षण करो ।
जो जो सत्य वदे त्याचे,
सदैव रक्षण करो ॥१०॥
ॐ पूर्ण ते, पूर्ण हे सारे,
पूर्णातुन पूर्ण येतसे ।
काढता शून्य शून्यातुन,
शून्य शेष जसे असे ॥११॥
परमात्मा गुरुशिष्यांचे,
करो एकत्र विकसन ।
आणि तसेच सर्वांचे,
करो एकत्र रक्षण ॥१२॥
गुरूंची आणि शिष्यांची,
उन्नती एकत्रच घडो ।
देवाकडून सर्वांचे,
एकत्र रक्षण घडो ॥१३॥
साधुया शौर्य एकत्र,
पराक्रम तसे करू ।
असोत अध्ययन तेजस्वी,
सर्वांनी निश्चय करू ॥१४॥
कशात ना कुणाचाही,
कधीही द्वेष ना असो ।
एकमेकांत ना मत्सर,
मनी दुर्भावही नसो ॥१५॥
हातपाय तशी अंगे,
सर्व सामर्थ्यवान् असो ।
वाचा कान तसे डोळे,
प्राणही बलवान असो ॥१६॥
इंद्रियांमधे तसे सर्व,
बल नांदोत सर्वदा ।
कर्तव्य-अध्ययनासाठी,
समर्थ सर्वही सदा ॥१७॥
उपनिषदांतून जाणून,
घ्यावे मर्म मी सदा ।
ब्रह्म सार सर्वांचे,
ब्रह्म म्हणजे विशालता ॥१८॥
माझ्याकडून स्वीकार,
त्या ब्रह्माचा सदा असो ।
विशालता मी न सोडावी,
ब्रह्म माझ्यामधे वसो ॥१९॥
ब्रह्माने मज न सोडावे,
स्वीकार मम ते करो ।
ब्रह्मरूप मला कधिही,
ब्रह्म ते नष्ट ना करो ॥२०॥
उपनिषदांतील आचार,
आत्मसात घडो मला ।
वसो माझ्यात ते नित्य,
आचरूदे सदा मला ॥२१॥
देव हो, प्रार्थना तुम्हा,
कृपेने हे घडो सदा ।
कानांना शुभ ऐकूदे,
नेत्रांना शुभ पाहुदे ॥२२॥
अंतर्बाह्य सदा आम्ही,
सर्वांगे स्थिर राहूया ।
बलवान, संतुष्ट होऊनी,
देवकीर्तीस गाउया ॥२३॥
देवा तुम्ही दिले जीवन,
तुमच्या स्मरणात घालवू ।
सर्वांच्या ते हितासाठी,
देवकार्यात राबवू ॥२४॥
ॐ शांति हा ‘शब्द’ही नाही,
शांतीचा ‘अर्थ’ ना असे ।
शांतीचा ‘अनुभविता’ नाही,
शांति शाश्वत तिथे वसे ॥२५॥
