रचना क्र. 119
नको नको मना गुंतू मायाजाळी
श्री तुकोबा
नको नको मना गुंतू मायाजाळी ।
काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥
काळाची ही उडी पडेल बा जेव्हा ।
सोडवीना तेव्हा मायबाप ॥२॥
सोडवीना बंधू पाठीची बहीण ।
शेजेची कामीण दूर राहे ॥३॥
सोडवीना राजा देशीचा चौधरी ।
आणीक सोयरी भली भली ॥४॥
तुका म्हणे तुला सोडवीना कोणी ।
एका चक्रपाणी वाचूनिया ॥५॥
