रचना क्र. 123
सद्गुरू यावे, मम भजनी सादर व्हावे
श्री सीताराम महाराज
सद्गुरू यावे ।
मम भजनी सादर व्हावे ॥धृ॥
तव आगमने विघ्ने पळती ।
कामादिक रिपु नष्टचि होती ।
आशातृष्णा मनि बहु झुरती ।
कोठे जावे ॥१॥
भवविपिनीचा मार्ग भयंकर ।
क्षुरधारेपरि म्हणती कविवर ।
सद्गुरु येउनि धरिति जरि कर ।
अमरचि व्हावे ॥२॥
किति रे माझा अंत पहासी ।
मज दीनासी काय मागसी ।
विश्वाचा तू पालक असशी ।
मनि समजावे ॥३॥
माझा धावा हा परिसोनी ।
दंड कमंडलु करि घेवोनी ।
देशिक आले हो धावोनी ।
आसन द्यावे ॥४॥
हृत्पीठावरि गुरू बैसले ।
भजनी प्रेमाचे पूर आले ।
सीतारामी चित्त रंगले ।
सात्त्विक भावे ॥५॥
