रचना क्र. 138
कितीक आमुची कामे अडली
श्री पेठेकाका
कितीक आमुची कामे अडली, करीलसा हो कुणी हवा,
कामासाठी देव हवा हो, कामासाठी गुरू हवा हो,
स्वस्त, शक्यतो फुकट हवा ! ॥धृ॥
अभ्यासाची अन् कष्टांची
कुचराई ही सदा आमुची
प्रदक्षिणांवर प्रसन्न होउनि
यश देणारा कुणी हवा ! ॥१॥
गृहकलहाने कुणी ग्रासले
कुणि चिंतेने त्रस्त जाहले
औषध त्यावर स्वत:च घेउन
अम्हा मुक्त करविता हवा ! ॥२॥
धनजीवन हे स्वार्थासाठी
उधळू आम्ही कसेहि जगती
दोष आमुचे प्रकट न करिता
दूर करिलसा कुणी हवा ! ॥३॥
आत्मपरीक्षण, विचार नाही,
प्रयत्न ना अनुताप कुठेही
दीन म्हणे रे आम्हांसाठी
होइल का अवतार नवा ? ॥४॥
