रचना क्र. 139
पुरे जगातील वणवण आता
श्री पेठेकाका
पुरे जगातील वणवण आता
वळवूया मोहरा
करूया अंतर्यात्रा जरा ॥धृ॥
सृष्टी , माणुस अन् देवाते
मागायाचे सतत किती ते
देहसुखाचे पात्र न भरते
सावध होऊ जरा...! ॥१॥
जेथे नाही तिथे शोधितो
वाया जीवन जगी दवडितो
मार्ग सुखाचा आतच असता
जगामधे का फिरा... ? ॥२॥
दीन म्हणे रे मनास बोधू
आत्मपरीक्षण करुनी शोधू
हृदयामधला स्वानंदाचा
अक्षय निर्मळ झरा... ! ॥३॥
