रचना क्र. 171
गुरू नव्हे , गुरे म्हणावी
श्री निरंजन रघुनाथ
गुरू नव्हे , गुरे म्हणावी पुष्कळ भरला हाट रे ।
स्वस्त मिळाले तरी त्यजावे अडक्याचे गुरु साठ रे ॥धृ॥
साधू साधू म्हणवुनि लोकी बहुतसा बोभाट रे ।
भलत्यालागी शिष्य करूनी धन घ्यावे अचाट रे ।
प्रतिवर्षी शिष्याघरि जावे मोठा पलपलाट रे ॥१॥
टोपीमाळा घालुनि पुष्कळ टाळ विण्याचा थाट रे ।
चौबारा बैसुनिया गावे मेळवुनी जन दाट रे ।
मोठ्याने आरडुनि सांगावे केले जे का पाठ रे ॥२॥
ऐसे गुरु जरि कोणी केले त्याला लाभला नाट रे ।
नरदेहासी येउनि चुकले निजप्राप्तीची वाट रे ।
निरंजनपद सांडुनि चढले यमपुरीचा घाट रे ॥३॥
