रचना क्र. 197
नको नको देवा मज देवपण
श्री पेठेकाका
नको नको देवा मज देवपण
माझे भक्तपण गोड मज ॥धृ॥
योगियां दुर्लभ भक्तां तू सुलभ
तुझा प्रेमलाभ नित्य मज ॥१॥
तुझिया नामाचा अवीट आनंद
कसा वर्णू छंद तुझा तुज ॥२॥
दर्शने चिंतने स्वत:चा विसर
हाती भक्तिसार आले मज ॥३॥
आता मज नाही मुक्तीचीही आस
जन्मोजन्मी दास करी मज ॥४॥
दीन म्हणे देवा जरी भक्त व्हाल
तुम्हीही मागाल पुन्हा भक्तपण ॥५॥
