रचना क्र. 205
सदा माझे डोळा
श्री तुकोबा
सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती ।
रखुमाईच्या पती सोयरीया ॥धृ॥
गोड तुझे रूप गोड तुझे नाम ।
देई मज प्रेम सर्व काळ ॥१॥
विठो माउलिये हाचि वर देई ।
संचरोनि राही हृदयामाजी ॥२॥
तुका म्हणे काही न मागे आणिक ।
तुझे पायी सुख सर्व आहे ॥३॥
