रचना क्र. 233
तपासुन घ्या अपुलं नाणं
श्री निरंजन रघुनाथ
तपासुन घ्या अपुलं नाणं । ऐका हो, घ्या अपुलं नाणं ।
संशय दूर करावा अंतरि । सांडुनि अभिमान ।
सख्यांनो, घ्या अपुलं नाणं, तपासुन घ्या अपुलं नाणं ॥धृ॥
चौऱ्यांशी खर्चुनिया मोले, घेतलं सोनं ।
तसंच न ठेवावं अपणा कळतं म्हणवून ।
चौकोनी कसवटीस पुरतं, पहा जे घासून ॥१॥
आपणापेक्षा वडील त्याला सद्गुरु म्हणवून ।
दाखवावं सोनं अंतर-गाठी सोडून ।
सरसनिरस पाहुनिया त्यांची, सांगेल तो खूण ॥२॥
तपासुनी न पाहाता शेवटी, होइल की हानी ।
टाकुनि हेमा बेगड धराल, झगझग पाहूनी ।
बरे बरे शोधा हे सांगे, सांगे निरंजन ॥३॥
