रचना क्र. 255
मन अद्भुत लीला
श्री पेठेकाका
मन अद्भुत लीला । प्रभुची ॥धृ॥
अचल कधी स्थिर । होइ अनावर ।
नमवी शूराला ॥१॥ लीला.. मन अद्भुत..
एक भुले मन । भुलवी तन जन ।
नकळे कोणाला ॥२॥ लीला..
जगि जे उन्नत । अथवा अवनत ।
मन हे साथीला ॥३॥ लीला..
शस्त्र म्हणावे । म्यान म्हणावे ।
मालकही भ्रमला ॥४॥ लीला..
तामस संगति । स्वरूप विस्मृति ।
घडवी जीवाला ॥५॥ लीला..
सात्त्विक संगति । दिव्य विभूती ।
जागवि देवाला ॥६॥ लीला..
मुक्त जगि कुणी । पुनरपि ये कुणी ।
कारण अवघ्याला ॥७॥ लीला..
जे नाकारी । ते स्वीकारी ।
निर्गुणसगुणाला ॥८॥ लीला..
दीन म्हणे जरि । सावध अंतरि ।
स्वामी तो तरला ॥९॥ लीला..
