रचना क्र. 20
जाणावे ते काय नेणावे ते काय
श्री तुकोबा
जाणावे ते काय नेणावे ते काय ।
ध्यावे तुझे पाय हेचि सार ॥धृ॥
करावे ते काय न करावे ते काय ।
ध्यावे तुझे पाय हेचि सार ॥१॥
बोलावे ते काय न बोलावे ते काय ।
ध्यावे तुझे पाय हेचि सार ॥२॥
जावे ते कोठे न जावे ते आता ।
बरवे आठविता नाम तुझे ॥३॥
तुका म्हणे तू करिसी ते सोपे ।
पुण्ये होती पापे आमुच्या मते ॥४॥
