रचना क्र. 463
सद्गुरुनाथा कृपा भाकितो
श्री नंदन
सद्गुरुनाथा कृपा भाकितो कृपा करा गुरुवरा ।
अनाथ बालक म्हणुनी मजला कडेवरि घेइ जरा ॥धृ॥
अनंतपापे जन्मोजन्मी विस्मरिलो तव पदा ।
स्वतःस मोठे समजुनि देवा ओढविली आपदा ।
अशाच वेळी स्वये प्रकटशी सोडवि हा भोवरा ॥१॥ अनाथ..
नसे योग्यता नसे साधना नसे शरणभाव ।
परमार्थाची ओढही नाही कसा भक्तिभाव ।
संगति तवही कशी लाभली नकळे मज पामरा ॥२॥ अनाथ..
कीर्ती तवही वर्णन करण्या नसे पुण्य वाणी ।
परी अंतरी कसा प्रकटला स्वये चक्रपाणी ।
दर्शन घेउनि पुण्य पावलो तुझे धैर्यसागरा ॥३॥ अनाथ..
बोधे तव हे शांत जहाल्या अंतरिच्या कल्पना ।
स्वरूपस्मरणी ध्यानी उमगे समचरणांच्या खुणा ।
सदासर्वदा गणुसी भेटी सखा बनुनी सोयरा ॥४॥ अनाथ..
